मशाल

माणसं ती माणसंच… आज ना उद्या सगळ्यांनाच देवाज्ञा होणार. पण म्हणून आजचा दिवस वाया घालवणारे कित्येक जण  दिसतील. म्हणतील , उद्या तर मरणारच आहोत तर आज का जगू नये मनासारखं. मनासारखं, बेबंद , बेधुंद, त्यात इतरांचा का विचार करावा? कारण मन तर माझं आहे ना.

खरं आहे त्यांच पण.…  आपण सगळे आज ना उद्या नक्कीच मारणार. मरणे या शब्दाचा अर्थ कितीही जरी बदलला तरी तो अटळ अंत आहे यावर दुमत होणे खूपच कठीण आहे. आता उरून उरला प्रश्नं जगण्याचा. श्वास घेणे, सोडणे, खाणे, झोपणे हे सारं जगणंच आहे. पण जगण्याचा खरा अर्थ ज्याला कळाला तो मनुष्य विरळाच. दुसऱ्याचे जगणे सुखकर व्हावे म्हणून स्वतःचे  जीवन जगणारा तो खरा जगला. तो देवमाणूस….  असा देवमाणूस मी तुझ्यात बघितलाय कौस्तुभ. खरं  सांगायचा झालं  तर कित्येक वेळा तुझा मला हेवा वाटला की तू जे करतो आहेस ते मी का नाही करू शकत. मग स्वतःची समजूत काढून शांत केलाय स्वतःला….

"रस्ता तुझा आगळा ,अन गाणे तुझे निराळे …
तू धुंद रे बरसतो , कधी थेंब ते मला दे

तू मिळवीन म्हणता मिळतो, तुजला महाल सारा…
जमले कधी तुला तर, ती प्रेरणा मला दे…

इवलीशी ओंजळ माझी, आहे रिती कधीची…
जमले कधी तुला तर, कवडसा तुझा मला दे ….

तू एक एक करता जिंकून घे जगाला.….
आठवांच्या कोनाड्याची ती जागा मला दे….

मी आहे अजुनी शोधतो, नाही मलाच ओळख ….
रात्रीस झोप उडते, ते स्वप्न तू मला दे ….

हृदयात मशाल निवली माझ्या मनी कधीची
पणती तुझी तेवणारी , ती ज्योत तू मला दे…

-कालदीप 

Comments

Popular Posts